मुंबई- मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांनंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या २ हजार १९९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ हजार ७०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
४२ मृत रुग्णांपैकी ३३ रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २७ पुरुष, तर १५ महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख २९ हजार ४५० वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ९ हजार ४३० वर पोहोचला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा १ लाख ९३ हजार ८०५ वर गेला आहे. सध्या मुंबईत २२ हजार ९१९ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६९ दिवस, तर सरासरी दर १.१ टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ६६० चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, ९ हजार ८२३ इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी १२ लाख ६१ हजार ८२२ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- उमेद अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्व योजना तशाच पूर्वरत सुरू राहणार