मुंबई : १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:१५ वाजता सुरुवात झाली. हौशी धावपटूंसाठी असणारी ४२.१९७ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन सकाळी ५:१५ वाजता सुरू झाली. या मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. संपूर्ण मॅरेथॉन कॅटेगिरीमध्ये ५५ हजार धावपटू धावणार असून हौशी मॅरेथॉनमध्ये ९ हजार स्पर्धक धावत आहेत. १२ वर्षाच्या युवकापासून ८१ वर्षांच्या धावपटूंचाही समावेश आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी देश-विदेशातून स्पर्धक येत असतात. हायले लेमीने टाटा मुंबई पूर्ण मॅरेथॉन जिंकली आहे. तर भारतीयांमध्ये गोपी टी. ने जिंकली पूर्ण मॅरेथॉन जिंकली आहे. टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये पहिला क्रमांक, हयले लेमी, (इथोपिया) २ तास ७ मिनिटे ३२ सेकंद. दुसऱ्या क्रमांकावर (केनिया) फिलेमन रोनो, २ तास ८ मिनिटे ४४ सेकंद, तिसऱ्या क्रमांकावर हेलू झेदू इथोपिया २ तास १० मिनिटे २३ सेकंद असे आहेत.
दोन वर्षानंतर मुंबईकर धावणार : घड्याळाच्या काट्यावर चालणारे शहर म्हणजे मुंबई अशी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख आहे. इथे प्रत्येक जण आपल्या वेळेनुसारच धावत असतो. त्याला मुंबईच स्पिरिट असे म्हणतात. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर मुंबईच हे स्पिरिट 18 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहे. 2020 नंतर प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईकर आपले कौशल्य दाखवण्यासाठी धावत आहेत. 2021 आणि 2022 मध्ये मुंबई मॅरेथॉनचे आयोजन कोरोनामुळे होऊ शकले नाही. यामुळेच यावेळच्या मॅरेथॉनबद्दल लोकांमध्ये अधिक उत्साह आहे. यावेळी मुंबई मॅरेथॉनसाठी 55 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. हाफ मॅरेथॉन वगळता इतर सर्व शर्यती रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू झाल्या आहेत.
१९० स्पर्धकांचा वाढदिवस : जगातल्या प्रख्यात १० मॅरेथॉनपैकी एक असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा १८ व्या एडिशनसाठी पूर्ण सज्ज झाली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी धावणारे १९० धावक हे सुद्धा या मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. या मॅरेथॉन मध्ये वाढदिवसाच्या दिवशी धावणाऱ्या १९० वाढदिवस स्पर्धकांमध्ये मुंबईची १३ वर्षाची पायल राठोड ही ड्रीम रनमध्ये धावणार असून या दिवशी ती आपला १३ वा वाढदिवस साजरा करत आहे. पायल या दिवसासाठी फार उत्सुक झाली असून मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणे म्हणजे एक स्वप्नच असल्याचे व त्यासोबत ड्रीम रनमध्ये धावणे त्याहून मोठे स्वप्न असल्याचे पायल सांगते.
रेल्वेकडून जास्त गाड्या : धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने दोन स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार असून त्यामुळे स्पर्धकांना, प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मेन लाईन वर कल्याण सीएसएमटी लोकल कल्याण स्थानकातून पहाटे ३ वाजता सुटली आहे. सीएसएमटी ला पहाटे ४:३० वाजता ती पोहोचली आहे. हार्बर मार्गावर पहाटे ३ वाजता सुटलेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ४:३० वाजता पोहोचली. पश्चिम रेल्वेवर सुद्धा विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान अतिरिक्त धीम्या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
ड्रीम रनमध्ये धावणार २० महिला सरपंच : संपूर्ण मॅरेथॉनमध्ये ड्रीम रन या गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धक सहभागी होत असून ड्रीम रन ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. यंदाचे या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरणात रोल मॉडेल आणि अग्रेसर असलेल्या २० महिला सरपंचांचा सहभाग या टाटा, मुंबई मॅरेथॉन मध्ये आहेत. पूर्ण मॅरेथॉन ४२.१९५ किलोमीटर ही स्पर्धा सकाळी ५.१५ मिंटानी सीएसएमटी येथून सुरुवात झाली. त्यानंतर अर्ध मॅरेथॉन २१.०९७ किमी पोलीस कप ही स्पर्धा माहीम दर्गा उरूस मैदान येथून सकाळी ५.१५ मिनिटांनी सुरुवात झाली. १० किलोमीटर रन ही स्पर्धा सीएसएमटी येथून ६ वाजता सुरू झाली. मॅरेथॉन एलिट गट ४२.१५ किलोमीटर ही मुख्य स्पर्धा सीएसएमटी येथून ७.२० मिनिटांनी सुरू झाली. चॅम्पियन विथ डिजाबिलिटी रन ही १:०३ किलोमीटरची स्पर्धा सीएसएमटी येथून ७:२५ मिनिटांनी सुरू होणार आहे. सीनियर सिटीजन रन ४:२ ही स्पर्धा सीएसएमटी येथून सकाळी ७.४५ मिनिटांनी सुरू होणार आहे. आणिसर्वात नावाजलेली ड्रीम रन ५.०९ किलोमीटर ही स्पर्धा सीएसएमटी येथून सकाळी ८.०५ मिनिटांनी सुरू होणार आहे.
मुंबई मॅरेथॉनयोहान ब्लेक ब्रँड अँबेसेडर : या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असलेला योहान ब्लेक याच्यामते मॅरेथॉन धावणे सोपे नाही. यात याप्रकारे एका विशिष्ट वेगाने धावावे लागते आणि हे इतके सोपे नाही. त्यासाठी सर्वोत्तम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती असणे गरजेचे आहे. मॅरेथॉन धावपटूंना त्यांच्या पात्रतेइतका आदर मिळतो. असे १०० मीटर धावणे प्रकारातील जगजेताआणि टाटा मुंबई मॅरेथॉन चा आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसिडर योहान ब्लेक यांनी म्हटले आहे.
इतरही विविध सुविधा : ५०० सदस्यांच्या महत्त्वाच्या टीम शर्यतीच्या दिवशी तैनात असतील. तसेच ८०० ट्राफिक पोलीस ६०० पोलीस ऑफिसर आणि ३ हजार पोलीस या दिवशी रूटवर तैनात असतील. तसेच ४५० मेडिकल स्टाफ आणि एशियन हार्ट चे ५० वॉलेंटियर त्यांच्यासोबत १३ ॲम्बुलन्स, डॉक्टर मोटरसायकलवर तैनात असतील. रस्त्यांचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले असून तीन ठिकाणी ५०,५० आणि ३० खाटांचे बेस कॅम्प तयार करण्यात आले असून १६ एड स्टेशन सुद्धा तयार करण्यात आले आहेत. २५ वॉटर स्टेशन, १० स्नॅक स्टेशन, ११ एलिट ड्रिंक स्टेशन तैनात करण्यात आले आहेत. सायन्स स्टेशन ते माहीम या दरम्यान सकाळी ३ ते ५ वाजता ३० बस सेवा सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.