मुंबई - पुन्हा सही रे सही या नाटकाला नुकतीच 18 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक केदार शिंदेने त्याचा मित्र आणि नाटकातील मुख्य कलाकार भरत जाधवला उद्देशून एक अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. या पोस्टद्वारे 18 वर्षाचा हा प्रवास निश्चित करताना दिग्दर्शक आणि नटाची नक्की काय मानसिक अवस्था होती ती मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
केदार यांनी लिहिलं आहे की, पुन्हा सही रे सही या नाटकाला आज १८ वर्ष आज पुर्ण होतायत. १५.०८.२००२ रोजी हा “सही” रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो.
तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. “भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज आणि.... भरत जाधव याने परत परत तेच केलं. तब्बल १८ वर्ष. या संपुर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ. त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील.
मी मुलीच्या बापाच्या भुमिकेत होतो आणि राहीन. आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा. या दरम्यान मुलीला काही अडचण, त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान “सासवा” बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. खुप समाधान वाटतं.
हे नाटक कधी बंद होऊ नये. पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की , अजून १८ वर्षाने ही वेळ येईल.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर नाटक थांबलय. त्यामुळे खुप नुकसान कलाकार, तंत्रज्ञांचं होतय. पण त्याही पेक्षा अधिक नुकसान रसिक प्रेक्षकांचं होतय. त्यांचं दिलखुलासपणे हसणं थांबलयं. पण काळजी नको. कोरोना पें रोने के बाद, त्यावर जालिम इलाज फक्त एकच असणार आहे..... “सही”
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी.. मी,भरत,अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे... “सही”
ही पोस्ट वाचल्यानंतर हे नाटक आजवर अनेकदा पाहिलेल्या प्रेक्षकाला ते पुन्हा एकदा पहावं अस नक्की एकदातरी वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वाट पहायची ते नाट्यप्रयोग सुरू करायला शासनाची कधी परवानगी मिळते याची.