मुंबई - जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला असताना इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला नवा कोरोना विषाणू आढळून आला आहे. नव्या कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी इंग्लंड येथून आलेल्या प्रवाशांची शोध मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान ११२२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. १६ प्रवासी आणि २ निकटवर्तीय पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
१६ प्रवासी तर २ निकटवर्तीय पॉझिटिव्ह -
पॉझिटिव्ह रुग्ण कुठील?
इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर पासून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यत ११२२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी १६ प्रवासी कोरोनाबधित आढळून आले आहेत. १६ पैकी नागपूरमध्ये ४, मुंबई ३, ठाण्यात ३, पुणे २, नांदेड १, अहमदनगर १, औरंगाबाद १, रायगड येथील १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. बाधित रुग्णांच्या निकटवर्तीय लोकांचा शोध घेतला जात आहे. आजपर्यंत ७२ निकटवर्तीयांचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यापैकी २ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
हेही वाचा - राज्यात २ हजार ८५४ जणांना कोरोनाची लागण; ६० रुग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा -
दरम्यान, जुन्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,१६,२३६ वर तर मृतांचा आकडा ४९,१८९ वर पोहचला आहे. १८,०७,८२४ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४,६४,१२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५८,०९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. १,२४,५१,९१९ इतक्या चाचण्या आज पर्यंत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.