मुंबई - पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील टँक पाखाडी या ठिकाणी एका घरावर छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी 3 प्लाय सर्जिकल मास्कचा तब्बल 17 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद मिराज इकरामुल हक शेख (32) या आरोपीला अटक केली आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारात हॅन्ड सॅनिटायजर व मास्कची मोठी मागणी आहे. मात्र, सध्या मास्कचा साठा करून त्याची काळ्या बाजारात दुप्पट विक्री सुरू असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारने 21 मार्चला अधिसूचना काढत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर दिलेल्या किंमतीतच विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आग्रीपाडा परिसरात केंद्राच्या या अधीसूचनेचे उल्लंघन करत मास्कचा तब्बल 57 हजार 500 नग इतका साठ बेकायदेशीरपणे केला होता.