मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली इमारतीचा काही भाग गुरुवारी सायंकाळी कोसळला. या इमारतीला लागून असलेली कक्कल इमारतीमधील 15 कुटुंब आज तिसऱ्या दिवशीही रस्त्यावर आहेत. त्यांना त्यांच्या घरात राहण्यास परवानगी दिली जात नसल्याने या रहिवाशांबाबत तातडीने निर्णय घेण्याचा इशारा आमदार राहुल नार्वेकर यांनी म्हाडाला दिला आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली इमारतीचा काही भाग गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोसळला. या इमारतीमधून एकूण 27 जणांना बाहेर काढले असून 12 जणांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडताच या इमारतीला लागून असलेली कक्कल ही पाच मजली इमारत रिकामी करण्यात आली. या इमारतीत 60 खोल्या असून सध्या 15 कुटुंबीय राहतात. इतर गावी गेले आहेत. हे 15 कुटुंबीय भानुशाली इमारत कोसळली तेव्हापासून घराबाहेर आहेत. कोणी मित्र, मैत्रिणीकडे, तर कोणी नातेवाईकांकडे राहत आहेत. या रहिवाशांना गेल्या तीन दिवसांत इमारतीत जाऊ दिले जात नसल्याने स्वत:चे हक्काचे घर असूनही ते दुसऱ्यांच्या दाराशी मुक्कामी आहेत.
या इमारतीला आज स्थानिक भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांनी भेट दिली. रहिवाशांना त्यांच्या घरात जाऊ दिले जात नसल्याने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच तातडीने निर्णय घेतला नाही तर आपण आमदार म्हणून रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती भूमिका घेऊ, असे नार्वेकर यांनी सांगितले.