मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ३०३ रुग्णांची तर ४०६२ संशयित रुग्णांची नोंद ( Measles Patients in Mumbai ) झाली आहे. अंधेरी येथील १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १४ झाली आहे. त्यापैकी ११ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या १२ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
१२ रुग्ण ऑक्सिजनवर, ५ आयसीयुमध्ये - मुंबईत ५३ लाख ६६ हजार १४४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४०६२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ३०३ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ९७ बेडवर रुग्ण असून २३३ बेड रिक्त आहेत. १४१ जनरल बेडपैकी ८०, १५४ ऑक्सीजन बेड पैकी १२, ३५ आयसीयु बेडपैकी ५ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून आज एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १३ हजार १८ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख ३४ हजार ८३३ मुलांना लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ ठिकाणी गोवरच्या पॉजीटीव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ३४९६ बालकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत ११ तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १४ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ११ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण ११ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ३ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
या उपाययोजना - गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.