मुंबई - राज्यात मेगा पोलीस भरती करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील साडेबारा हजार पोलिसांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या निर्णयाला मराठा समाजाकडून कडाडून विरोध सुरू झाल्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासाठी १३ टक्के जागा शिल्लक ठेवून इतर जागांवर भरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राष्ट्रवादी भवन येथे आज झालेल्या जनता दरबारादरम्यान देशमुख यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाकडून पोलीस भरती संदर्भात अनेक प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे सरकार मराठा समाजाच्या बाजूने आहे. त्यांच्यावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही. पोलीस भरती करण्यात येत असली तरी मराठा समाजासाठी जागा सोडण्यात येतील, असे देशमुख म्हणाले.
काल राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातील विरोधी पक्ष नेत्यांकडून मराठा समाजावर अन्याय करणारा सरकारने निर्णय घेतला, अशा स्वरूपाचे दावे करण्यात येत आहेत. मराठा क्रांती मोर्चाने पोलीस भरती होऊ देणार नाही. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला. मराठा समाजा संदर्भात काही पक्ष राजकारण करत आहेत. मात्र, आम्ही या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.