मुंबई- देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.
चीनच्या हुवांग प्रांतातील कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात या विषाणूचे ९७ तर शहर परिसरात ५६ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी १७ आणि २१ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यानंतरही गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, असे आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याने सरकारने अखेर संचारबंदी लागू केली आहे.
राज्यात एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची लागण झालेल्या १२ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णांना बरे करण्यात मोठे यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या १२ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
रुग्ण निगेटिव्ह कसा समजला जातो
कोरोना विषाणूची लागण झालेला किंवा ज्याला लागण झाल्याचे संशय आहे, अशा रुग्णाला रूग्णालयात दाखल केले जाते. स्वाबच्या साहाय्याने रुग्णाच्या घशातील लाळ घेऊन त्याची तपासणी करण्यात येते. त्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार केले जाते. रुग्णाला १४ दिवस रुग्णालयात ठेवले जाते. या कालावधीत त्या रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवली जाते. त्याला ताप, सर्दी, खोकला झाल्यास आवश्यक ती औषधे दिली जातात. या दरम्यान रुग्णाची अनेकदा तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला आहे असे समजल्या जाते.
५२३८ रुग्णांना तपासले
२३ जानेवारीपासून शहरातील ५ हजार २३८ जणांना कस्तुरबा आणि इतर रूग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात तपासण्यात आले आहे. त्यापैकी १ हजार २१० संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कस्तुरबा आणि इतर खासगी रुग्णालयातून आतापर्यंत १ हजार ६४ संशयित रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत शहर आणि शहराबाहेरील असे एकूण ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा १७ मार्चला, दुसऱ्याचा २१ मार्चला मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- COVID १९ : राज्यात 15 नवीन बाधित रुग्ण; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 89