मुंबई - मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाकडून सध्या चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या पथकाने 11 आरोपींना अटक केली आहे. तर, 50 पेक्षा अधिक जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी ११वा आरोपी माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला आहे.
आशिष चौधरी माफीचा साक्षीदार होण्यास तयार -
मुंबई क्राईम ब्राँचने सोमवारी आशिष चौधरी व अभिषेक कोलावडे या दोन आरोपींना कोर्टात हजर केले होते. नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी आशिष चौधरी याची 'क्रिस्टल ब्रॉडबँड' नावाची कंपनी आहे. ही कंपनी केबल डिस्ट्रीब्यूशनचे काम करते. आरोपी आशिष चौधरी याने पोलिसांकडे माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.
पोलिसांची कोर्टाला विनंती -
आशिष चौधरीकडून पोलीस चौकशीमध्ये सहकार्य केले जात आहे, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. आशिष चौधरीची पोलिसांतर्फे माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून न्यायालयामध्ये त्यासंदर्भात आदेश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. सोमवारी अशिष चौधरीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या अगोदर अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलावडेला न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे.
दर महिन्याला मिळत होते 15 लाख रुपये -
अभिषेक कोलावडेच्या पोलीस चौकशीमध्ये त्याने कबूल केले आहे की आशिष चौधरीकडून त्याला पैसे मिळत होते. त्यामध्ये वॉव म्युझिक चॅनल व रिपब्लिक टीव्हीची टीआरपी वाढवण्यासाठी पंधरा लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार या दोघांमध्ये झाला होता. हे पैसे 2017 ते जुलै 2020 पर्यंत टप्याटप्याने मिळाले असल्याचे अभिषेकने सांगितले आहे. यासाठी हवालाचाही वापर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
काय आहे टीआरपी घोटाळा -
चलचित्र वाहिन्यांचे टीआरपी ठरवण्यासाठी देशभरात 30 हजारांहून अधिक मापदंड तर मुंबईसारख्या शहरात 2 हजारांहून अधिक मापदंड करण्याची जबाबदारी बीएआरसीवर आहे. मात्र, याचे कंत्राट हंसा नावाच्या एजन्सीला देण्यात आले होते. टीआरपी छेडछाडीचे रॅकेट परदेशातही अस्तित्वात असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईतील काही अशिक्षित लोकांच्या घरी इंग्रजी न्यूज चॅनल लावून ठेवण्याची अट हंसा एजन्सीकडून घालण्यात येत होती. यासाठी संबंधितांना महिन्याला ठराविक पैसेही दिले जात होते. या टीआरपी घोटाळ्यात दोन मराठी चॅनेल व एक भारतीय इंग्रजी न्यूज चॅनलचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही मराठी चॅनलच्या मालकांना मुंबईतून अटक केली आहे.