मुंबई- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून ईटलीमध्ये शंभराहून अधिक रुग्ण दगावले आहेत. याच ईटलीची राजधानी रोममध्ये १०२ भारतीय विद्यार्थी अडकले असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, की रोममध्ये १०२ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना कोणत्याही सुविधा नाहीत. भारतात येण्यासाठी हे विद्यार्थी रोमच्या विमानतळावर आले होते. मात्र, ईटलीहून-भारतात येणारी सर्व विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे ही मुले रोममध्येच आडकली आहेत. याबाबत मी रोममधील भारतीय दूतावासासोबत संपर्क साधला असून आरोग्य मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाला देखील याबाबत माहिती दिली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर, भारत सरकारने या विद्यार्थ्यांना त्वरित सुविधा द्याव्यात, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केली आहे.
हेही वाचा- 'कामगार नेते दत्ता इस्वलकरांनी त्यांच्या अनुभवाचे लिखाण करावे'