मुंबई: मध्यान्ह व रात्री जेवण योजने अंतर्गत भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी 100 कोटींचा तर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी 8 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.
माहिती अधिकारातून खुलासा : सुषमा अंधारे म्हणाल्या की, जळगावच्या जिल्हा संघटक गायत्री सोनवणे यांनी या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली होती. 'मिड डे मिल' म्हणजेच मध्याह्न भोजन योजना ही बांधकाम कामगारांसाठी अस्तित्वात आणली गेली आहे. आम्ही फक्त जळगाव जिल्ह्यातील माहिती 20 फेब्रुवारी 2023 ला मागवली होती. संपूर्ण मध्यांन्न भोजनाची यादी मागवली असता जळगाव जिल्ह्यात साधारण 35 ते 40 हजार कामगार असल्याची यादी प्रशासनाने दिली.
बिलाची आकडेवारी थक्क करणारी : सुषमा अंधारे म्हणाल्या की, या यादीनंतर 9 मार्चला टेंडर देण्यात आलेल्या कंपनीची माहिती मागविण्यात आली. 30 मे रोजी याचे उत्तर आले. त्यानुसार 15 दिवसांचे बिल 58 लाख रुपये, ऑक्टोबरचेही असेच मोठे बिल काढले. नोव्हेंबर महिन्याचे बिल 3 कोटी काढण्यात आले. डिसेंबर 3.13 कोटी रुपये, जानेवारी महिन्यात बिल 6.93 लाख रुपये, फेब्रुवारी महिन्यात 7 कोटी रुपये बिल काढण्यात आले. मुळात कोणत्याही जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कामगार नाहीत.
जेवणारे मजूर परप्रांतीय : सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही या कामगारांची नावे अणि संपर्क क्रमांक माहिती अधिकारात मागवले. त्यानंतर ज्या कामगारांना जेवण दिले जाते त्यांना संपर्क केला असता त्यातील एकही जण हे महाराष्ट्रातील नसून गुजरात, कर्नाटक असे वेगवेगळ्या राज्यातील माणसे आहेत. मध्यान्न भोजन योजनेचे जेवण जिथे बनवले जाते तिथे आम्ही गेलो असता ज्या डब्यातून जेवण दिले जाते ते सगळे डबे अर्ध्याहून कमी भरल्याचे आमच्या लक्षात आले. गाडी चालकांना जेवण कुठे वाटायचे ते देखील माहीत नव्हते. असा सगळा सावळा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्टीकरण अंधारे यांनी दिले.
घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे देणार : मध्यान्न भोजन योजनेत जळगावात घोटाळा झाला आहे. ठराविक कंपन्यांना कंत्राट दिले जात आहे. किरीट सोमय्यांना हे का दिसलं नाही? सुषमा अंधारे यांनी असा प्रश्न विचारत गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. ही सगळी कागदपत्रे आम्हाला भाजपने दिली आहेत, हे देखील आम्ही सिध्द करू शकतो. आम्ही या १०० कोटी रुपयांच्या मध्यान्न भोजन योजना घोटाळ्याची कागदपत्रे घेऊन लवकरच ईडीमध्ये जाणार आहोत. जळगाव जिल्ह्यातील १०० कोटी रुपयांच्या मध्यान्न भोजन योजनेत विवेक जाधव आणि शिरीष सावंत यांची नावे देखील आहेत. विवेक जाधव यांचे नाव जरंडेश्वर साखर कारखाना आणि चिक्की घोटाळ्यात देखील आले आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: