मुंबई - पुण्यात ८, तर मुंबईमध्ये २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरानाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोना संशयितांनी १४ दिवस घरातच राहावे. तसेच जनतेनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
विदेशी टूरवर गेलेला ४० जणांचा समूह होता. यामध्ये ३ जण कर्नाटकचे आहे, तर उर्वरीत महाराष्ट्रातील आहेत. सर्वांसोबत संपर्क झालेला आहे. त्यामधील प्रत्यक्ष १० जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. याची लक्षणे १४ दिवसापर्यंत दिसू शकतात. त्यामुळे सर्वांनी १४ दिवसापर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वांनी स्वच्छता बाळगावी. तसेच हस्तांदोलन करणे टाळावे. सर्दी, खोकला, ताप असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले. यासाठी प्रसंगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सर्वांनी घाबरून न जाता सामना करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावैळी केले.
आयपीएलबाबत त्यांना विचारले असता, आम्ही प्रेक्षकाशिवाय आयपीएलची मॅच करू शकतो, असे अधिकृत म्हणणे आमच्यापर्यंत आलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
...म्हणून अधिवेशनाचे कामकाज थांबवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत संपवणार आहे. सभागृहात कधी लक्षवेधी मांडल्या जातात. कधी कोणते प्रश्न उपस्थित होते. त्यासाठी राज्यातील विविध भागातून जवळपास साडेतीनशे अधिकारी येत असतात. तसेच प्रशासनाचे अधिकारी देखील गुंतलेले असतात. यामध्येच कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी हे सर्व आमदार आणि प्रशासकीय अधिकारी त्या-त्या भागात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज थांबवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील सहमती दर्शवली आहे.
मुंबईतील गर्दी समजू शकतो. मात्र, इतर ठिकाणी पक्षाचे मेळावे, लग्न, कॉन्फरन्स असे कार्यक्रम टाळावे. तसेच मुख्यमंत्री प्रत्येक विभागात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्याद्वारे संपर्क साधणार असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले.
टूरीस्ट कंपन्यांचे विमान मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांनी प्रशासनाला कळवावे. त्यानंतर सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येईल. तसेच पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात त्यांची सोय करण्यात येणार असल्याचेही पवार म्हणाले.
आपल्याकडे सर्व सोईसुविधा उपलब्ध - आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये आयसोलेशन बेड तयार केले आहेत. तसेच सर्व मेट्रो सिटीमध्ये शासकीय रुग्णालये, पालिका रुग्णालय तसेच इतर खासगी रुग्णालयात देखील ७०० ते ७५० बेडची सोय आहे. तसेच यासाठी प्रशिक्षत केलेले डॉक्टर सार्वजनिक विभागाच्या डॉक्टरांना प्रशिक्षण देणार आहे. तसेच पुरेसा मेडीकल स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे सर्व सोईसुविधा देखील उपलब्ध आहेत. ऑक्सीजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.