लातूर - शेती व्यवसायात सततची नापिकी आणि वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जळकोट तालुक्यातील पाटोदा येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. लक्ष्मण किशन नागरगोजे (वय 30) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
लक्ष्मण यांना केवळ तीन एकर शेत जमीन होती. यावर ते नवनवीन प्रयोग करून शेती करत व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. यासाठी त्यांनी बँकेचे कर्जही घेतले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले. शिवाय बाजारभावही योग्य मिळत नसल्याने ते अडचणीत आले होते. कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत असल्याने लक्ष्मण नागरगोजे यांनी गळफास घेतला. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी शेतामध्ये आले होते. पण दुपारी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील बाभळीच्या झाडाला लटकताना शेजाऱ्यांनी पहिला. त्यांनी याची माहिती नातेवाईकांना दिली. यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.