लातूर - कामगारांची झालेली घुसमट आणि अन्याय दूर करण्यासाठी एक आंदोलन उभारण्यात आले होते. ज्या दिवशी कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता झाली तो दिवस हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, अद्यापही कामगारांना न्याय आणि त्यांचा हक्क मिळाला आहे का? याबाबत साशंकता आहे. आजही अनेक कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. शासकीय योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने त्यांची हेळसांड सुरूच आहे. सध्याचे लॉकडाऊनमुळे कामगारांच्या समस्येत वाढ झाली आहे. हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही या अवस्थेत कसला कामगार दिन? अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.
लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंजगोलाई या ठिकाणी हजारोच्या संख्येने कामगार कामाच्या शोधात जमतात. कुणाला काम मिळते तर कुणाला आल्या पावली परतावे लागते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने कुणालाच काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करावा कसा? असा प्रश्न जिल्ह्यातील कामगारांसमोर आहे.
दरवर्षी कामगार दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एकही कार्यक्रम पार पडलेला नाही. कामगारांना सुरक्षा किट, धान्य देण्याच्या घोषणा झाल्या मात्र, प्रत्यक्षात पदरात काहीच पडलेले नाही. आज कामगार दिन असल्याने शेकडो कामगार एकत्र जमा झाले होते.