लातूर - अनैतिक संबंधामुळे संसाराची कशी राखरांगोळी होते, याचे जिवंत उदाहरण रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात समोर आले आहे. महिलेचा संसार पतीबरोबर आणि अनैतिक संबंध दुसऱ्या बरोबर सुरु होते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पंरतु, या महिलेनेही नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच हा सर्व प्रकार आपल्याच अंगलट येणार, या भीतीने प्रियकारानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सात हजार लोकसंख्या असलेले खरोळा हे रेणापूर तालुक्यातील गाव गेल्या 12 दिवसात दोघांच्या आत्महत्या तर एका तरुणाचा मृतदेह कोरड्या विहिरीत आढळल्यामुळे हादरले होते. मात्र, तपासाअंती या तीनही घटनेमागे प्रेमाचा त्रिकोण असल्याचे सत्य समोर आले आहे. लखन राऊतराव आणि त्याची पत्नी मनीषा हे गावात एकत्र कुटुंबात राहत होते. 27 मे रोजी मनीषा हीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पती लखन राऊतराव यांच्यासह सासू- सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली होती तर पती लखनचा शोध सुरू होता.
हेही वाचा... खरोळमध्ये दहा दिवसात दोन आत्महत्या तर एकाचा मृतदेह आढळला विहिरीत
दरम्यान, गावातीलच विजयकुमार छपरे याला चौकशीसाठी रेणापूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र, लघुशंकेचा बहाणा करून विजय ठाण्याच्या बाहेर आला आणि थेट घरी जाऊन त्यानेही आत्महत्या केली. त्यामुळे या दोन्ही आत्महत्या आणि बेपत्ता असलेला लखन राऊतराव यांचा काही संबंध असल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध सुरू केला.
यानंतर गावाजवळील एका कोरड्या विहिरीत लखनचा मृतदेह आढळून आला. एका पोत्यामध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे अनैतिक संबंधास अडथळा होत असलेल्या लखनचा काटा पत्नी मनीषा आणि विजयकुमार छपरे यांनी काढला असल्याचा पोलिसांनाी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या घटनेने बैचेन असलेल्या मानिषाने त्यामुळेच नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असावी आणि हा सर्व प्रकार आपल्याच अंगलट येणार म्हणून विजय छपरे यानेही आत्महत्या केली असावी, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
मृत लखनचे मामा यांनी याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मनीषा आणि विजयला आणखीन कोणी मदत केली का, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.