लातूर - गुन्हेगार कितीही सराईत असला तरी त्याचा गुन्हा हा सिद्ध होतोच. याकरिता काही काळ लोटला जाईल, पण सत्य हे समोर येणारच. असाच प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. नवऱ्याच्या नावावरील विम्याची एक कोटीची रक्कम हडप करण्यासाठी पत्नीने आतेभावाबरोबर कट करून पतीचा खून केल्याची घटना 9 वर्षापूर्वी बाभळगाव-निटूर मार्गावर घडली होती. पण, हा अपघात असल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र, विमा कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून शोध सुरू झाला आणि 9 वर्षानंतर सत्य समोर आले आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर येथील आण्णाराव बनसोडे हे फर्निचरचे काम करायचे. इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांच्या पत्नीचा आत्तेभाऊ व विमा एजंट रमेश विवेकी याने बनसोडे यांच्यासाठी एक कोटीचा विमा काढला होता. त्यांनतर काही हफ्ते त्यांनी नियमित भरले. त्यांनतर अवघ्या काही महिन्यातच आण्णाराव बनसोडे हे निटूरहून लातूरला येत असताना त्यांचा अपघात झाला व यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हे प्रकरण संशयास्पद असतानाही औसा पोलीस ठाण्यात अपघात अशीच नोंद करण्यात आली होती. यानंतर विम्याची रक्कम मिळावी असा दावा कंपनीकडे दाखल करण्यात आला. परंतु, यामध्ये सर्वच काही संशयास्पद असल्याने विमा कंपनीच्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली आणि अहवाल कंपनीकडे सादर केला.
15 सप्टेंबरला पोलीस अधीक्षकांनी अधिक तपास करण्याची केली सूचना
अहवालात या घटनेबाबत संशय व्यक्त करण्यात आल्याने विमा कंपनीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विमा कंपनीने संशय व्यक्त करताच आण्णाराव बनसोडे यांचे भाऊ सोमनाथ बनसोडे यांनी विम्याची रक्कम हडप करण्यासाठीच हा खून झाल्याची तक्रार दिली. असे असले तरी आण्णाराव यांच्या पत्नीला वगळून विमा एजंट रमेश विवेकी त्याचा मित्र गोविंद सुबोधी याचाच खुनात सहभाग असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, यामध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्याने 15 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक यांनी अधिकचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार आण्णाराव यांच्या पत्नी ज्योती बनसोडे यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. 20 ऑक्टोबर रोजी औसा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी (30 नोव्हेंबर) ज्योती बनसोडे व रमेश विवेकी याला अटक करण्यात आली.
दोन पोलिसांवरही कारवाई...
घातपात असतानाही हा अपघात असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, सर्वकाही संशयास्पद असतानाही औसा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हा केवळ अपघात असल्याची नोंद केली होती. त्यामुळे, कांबळे आणि सुडे यांना नौकरी गमवावी लागली. पोलीस अधीक्षकांनी कारवाईबाबत सूचना केल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे.
मुख्य आरोपी हा साहित्यिक
आरोपी रमेश विवेकी हा लेखक आहे. दमण, हे त्याचे पुस्तक असून इतर विषयावरही त्याने लेखन केले आहे. शिवाय तो विमा कंपनीचा एजंटही होता. झटपट पैसे कमवण्याच्या प्रयत्नात उचललेले पाऊल नऊ वर्षानंतर का होईना त्याच्या अंगलट आले आहे.
हेही वाचा - पदवीधर रणधुमाळी : लातुरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद