लातूर - कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारन्टाइन केले जाते. तसेच रुग्णाचे वास्तव्य असलेला परिसर सील करण्यात येतो. या भागात अन्न-धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार मुख्य शहरालगतच्या हरंगूळ (बु) येथे समोर आला आहे. कोरोनामुळे नाही, मात्र उपासमारीने जगणे मुश्किल होत असल्याने अन्न- धान्याची सोय न केल्यास नियम डावलून घराबाहेर पडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लातूर तालुक्यातील हरंगूळ (बु) येथे आठ दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे रुग्णाच्या शेजारी असलेल्या 7 कुटुंबांचाही समावेश कंटेनमेंट झोनमध्ये करण्यात आलाय. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये घरामध्ये असलेल्या धान्यावर त्यांनी गुजराण केली. मात्र, आता आठ दिवसानंतर उपासमारीची वेळ आली आहे. रोजंदारीवर पोट असल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये अन्न- धान्य पुरवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, गावात प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सध्या शेतीची कामं रखडली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्या सामाजिक कार्यकर्ते व्यंकट पन्हाळे यांच्याकडे मांडल्या आहेत. तसेच संबंधित परिस्थिती तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, अद्याप मदत पोहोचलेली झालेली नाही. त्यामुळे आता कामावर जाण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नसल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून परिसर सील करण्यात येतो. मात्र, त्या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे देखील दुर्लक्ष कऱण्यात येते. यामुळे नियम डावलून घराबाहेर पडणार असल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.