निलंगा (लातूर) - शहरासह अनेक गावात आज (शनिवारी) दीड वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. यावेळी व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता, की अनेक झाडे, विजेचे खांब मोडले गेले. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले. या सर्व प्रकारामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
सकाळपासून उन्हाची तीव्रता असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच वादळाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह निलंगा शहरासह तालुक्यातील झरी, लांबोटा, सिंदखेड, निटूर, अंबुलगा बु. केळगाव, कलांडी यासह आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हेही वाचा - किसान सन्मान दिन; 'आजार कोणताही असो शेतकऱ्याचं मरण ठरलेलच. . . . '
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेली. तर तारे लोंबकळत पडल्या आहेत. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीसाठी सोयीचा मानला जात आहे. तर शिवाय सतत अधूनमधून कृतिका नक्षत्रात अवकाळी पाऊस पडत असल्याने भविष्यात मुबलक पाऊस पडेल की नाही, अशी भितीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.