लातूर - शेत जमिनीवरून भावा-भावात होणारे वाद टोकाला पोहचले आणि यामधून भावाची तर हत्या झालीच शिवाय सासऱ्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या जावयालादेखील जीवाला मुकावे लागले. ही भयानक घटना उदगीर तालुक्यातील हेर येथे घडली असून आठ जणांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर तालुक्यातील हेर येथे बालाजी माधव जगताप व गोविंद माधव जगताप या भावात शेत जमिनीवरून सातत्याने वादंग निर्माण होत होते. यामुळे अनेकदा पोलीस ठाण्याची पायरीही हे दोन्ही भाऊ चढले होते. मात्र, वेळोवेळी समजूत काढून पोलिसांनी मधला मार्ग काढला होता. परंतु, बुधवारी हा वाद टोकाला गेला. बुधवारी सकाळी जमिनीच्या वादातून बालाजी जगताप याने तलवार, कुऱ्हाडी आणि लोखंडी गजाने मारहाण केली. यामध्ये मोठा भाऊ भगवान जगताप हे गंभीर जखमी झाले तर गोविंद जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.
भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या जावयाचा मृत्यू
भावा-भावातील भांडणे सोडविण्यासाठी गोविंद जगताप यांचे जावई हे देखील हेरमध्ये आले होते. दरम्यान, त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये जगताप यांचे जावई नितीन तावडे हे गंभीर जखमी झाले होते. अत्यवस्थ अवस्थेत असताना त्यांना उपचारासाठी लातूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत गोविंद जगताप यांच्यासह त्यांच्या जावयालादेखील जीव गमवावा लागला. या घटनेत बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहु जगताप, पूजा जगताप, सोजारबाई ठगे आणि माजी पोलीस पाटील पंडित पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सासरा आणि जावई यांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.
माजी पोलीस पाटलाच्या सांगण्यावरून भांडणे विकोपाला
गावातील माजी पोलीस पाटील पंडित पाटील हे भावा-भावामध्ये सातत्याने भांडणे लावत असत. यावरूनच दोन्ही भावात अधिक तेढ निर्माण झाली आणि ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप गोविंद जगताप यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या जावयाला यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. घटनास्थळी उदगीर ग्रामीणचे पोलीस अधिकारी दाखल झाले होते, अधिक तपास हा सुरू आहे.