अहमदपूर (लातूर) - शेतात शेळ्या चारताना दिसलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून सख्खे बहिण-भाऊ आणि एक चुलत भाऊ पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अचानक तोल गेल्याने या तिघांचाही नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री परिसरात घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू -
ज्ञानोबा व तुकाराम जायभाये हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे शेत मन्याड नदीच्या काठावर आहे. नेहमीप्रमाणे हे दोघे भाऊ आणि प्रतिक, रोहिणी, गणेश ही मुले सकाळी शेताकडे गेली होती. ज्ञानोबा व तुकाराम हे दोघेही भाऊ शेतातील काम करत होते. दुपारच्या वेळी हे तिन्ही भावंडे शेळ्या चारत मन्याड नदी काठावर आली. तेव्हा त्यांना एक लाकडाचे ओंडके दिसले. पाण्यात तरंगण्याचा मोह त्यांना आवरला नाही. सदरील ओंडक्यावर बसून पाण्याचा आनंद घेत असताना तोल गेल्याने तिघेही पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांची भेट -
गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेवून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
घटनास्थळास उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, किनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि शैलेश बंकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी किनगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.