लातूर - महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अक्रम मिर्झा बेग या आरोपीच्या नातेवाईकांकडून आता पीडित महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. यासंबंधी पीडित महिलेने व तिच्या आईने तक्रार नोंदवली आहे.
अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 27 वर्षीय महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केला जात होता. याप्रकरणी शहरातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या अक्रम मिर्झा बेग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंद केल्यानंतर तक्रार मागे घ्यावी अन्यथा शहरात राहू देणार नाही आणि जीवे मारू अशा धमक्या पीडितेला व तिच्या आईला दिल्या जात आहेत. याप्रकरणात आरोपीला पीडितेच्या पतीचीही मदत होत असल्याने त्यालाही सहआरोपी करण्याची मागणी या महिलेने केली आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
सोमवारी सकाळी आरोपीच्या बहिणीसह समाजातील इतर नातेवाईक पीडित महिलेच्या घरी गेले होते. रात्री अपरात्रीदेखील घरी येऊन आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाने आता एक नवेगळेच वळण घेतले असून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्हि.आय. एडके अधिक तपास करीत आहेत.