लातूर - सध्याच्या निवडणुकीच्या काळात इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असला तरी लातूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या दरम्यान, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने प्रती घराला 200 लीटर पाणी वाटपाचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तात्पुरता का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - लातूरमधील केंद्रेवाडीत एकाच रात्री ६ सैनिकांच्या घरी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास
मांजरा धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लातूरसह अंबेजोगाई, केज, कळंब या शहरातील नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. सद्य स्थितीमध्ये शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबत औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी तुर्तास 1 ऑक्टोबरपासून प्रती कुटुंबास 200 लीटर पाणी वाटपाचा निर्णय 1 महिना पुढे ढकल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता
परतीच्या पावसामुळे धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरु राहिल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याला मांजरा धरणात 4.5 दलघमी पाणीसाठा असल्याने काही दिवसापूर्वीच 1 तारखेपासून 200 लीटर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.