निलंगा (लातूर) - तालुक्यातील नदीहत्तरगा गावातील एका महिलेला काही जणांना घरात घुसून तिला अर्धनग्न करत मारहाण झाल्याची घटना 6 सप्टेंबरला घडली होती. याबाबत पीडित महिला व तिचे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार लिहून घेतली. मात्र, कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर पीडितेने भारतीय मानवाधिकार परिषेदेच्या लातूर जिल्हाध्यक्षा हेमा दादाराव जाधव यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कासारसिरसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डमाळे यांच्याकडे केली. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींना तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, की नदीहत्तरगा येथील एक महिला 6 सप्टेंबरला आपल्या पती व तीन मुलांसह स्वतः च्या घरी झोपली होती. त्यावेळी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावातील पवन राजेंद्र शेटकार, त्याचा मेहुणा, सुनील सुरेश शेटकार व गणेश भालचंद्र हे दार ढकलून घरात घुसले व पान टपरीवर झालेल्या भांडणाच्या रागातून त्यांनी पीडितेच्या पतीला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीडित महिलेने पतीला मारू नका म्हणत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्या महिलेला अर्धनग्न करत मारहाण केली. यावेळी पवन शेटकारच्या मेहुण्याने त्या महिलेचा विनयभंग केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली. दरम्यान, हा गोंधळ ऐकून आसपासच्या काहींनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यातील एका महिलेने पीडितेच्या अंगावर चादर टाकली. गावकऱ्यांनी सोडवासोडव केल्यानंतर सर्वांना बघून घेतो, अशी धमकी देत त्या चौघांनी पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रात्र झाल्याने पीडितेने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला सांयकाळी तक्रार देण्यासाठी कासारसिरसी पोलीस ठाण्यात गेली असता येथील ठाणे अमलदार यांनी तक्रार अर्ज घेऊन गुन्हा दाखल न करताच पाठवून दिले होते. यामुळे पीडितेने हेमा जाधव यांच्याकडे धाव घेत सर्व प्रकार कथित केला. त्यानंतर त्यांनी कासारसिरसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डमाळे यांच्याकडे सर्व हकीकत मांडली व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबात 15 सप्टेंबरला कासारसिरसी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात भा. दं. वि.चे कलम 452, 354, 427, 323, 504,506 व 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत असून अद्याप आरोपीस अटक करण्यात आले नाही.
दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी, विजयकुमार सूर्यवंशी, बालाजी कांबळे, दादाराव जाधव, दत्ता सूर्यवंशी अर्जुनअप्पा कटके यांनी दिला आहे.
हेही वाचा - पालकमंत्री देशमुखांच्या बाभळगावातील गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाचा घंटानाद