लातूर - निलंगा तालुक्यातील अंबुलगा पंचक्रोशीत मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात ४० मीली मीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील सावनगीरा, जाजनुर, अंबुलगा बुद्रुक, काटे जवळगाव, केदारपूर, हणमंतवाडी, बोटकुळ भागात शेतकऱ्यांची पेरणी केलेली पिके वाहून गेली.
यावर्षी पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर खरीपाच्या पेरण्या करून घेतल्या. काही ठिकाणी पीके उगवून देखील आली आहेत. मात्र, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नव्याने पेरणी केलेले बियाणे व उगवून आलेली लहान पिके या पावसात वाहून गेले. काही ठिकाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करण्यासाठीही शेतकऱ्यांना वाफसा येण्याची वाट बघावी लागणार आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे संकटात आलेल्या शेतकऱयांनी आर्थिक अडचणींचा सामना करून पेरणी केली. मात्र, निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षी आवकाळी पाऊस पडून रब्बी पिकांचे नुकसान झाले आणि आता खरीपात पेरलेले बी वाहून घेऊन गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
दरम्यान, निलंगा-अंबुलगा रस्त्यावरील सावनगीरा गावानजीक असलेला पूल काही काळ पाण्याखाली होता. त्यामुळे लहान-मोठ्या वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागले. नागरिकांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.