लातूर - सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये अर्थार्जनाचा प्रत्येकाचा हेतू वेगळा असेल. मात्र, लातूरमधील एकाने चक्क मुलीच्या लग्नासाठी आर. डीच्या माध्यमातून जमवलेली १० लाखाची रक्कम मोडीत काढली आणि पक्ष मजबुतीसाठी प्रकाश आंबेडकरांना देऊ केली. सुशील चिकटे असे त्यांचे नाव असून ७ एप्रिलला अहमदपूर येथील सभेत त्यांनी ही रक्कम कुटुंबासमवेत प्रकाश आंबेडकर यांना सुपूर्द केली आहे.
सुशील चिकटे यांचे लातुरात फायनान्स आणि किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांना एकत्र आणण्याचा संकल्प केला असून हा प्रयत्न सर्वांसाठीच लाभदायी आहे. त्यामुळे अशा उपक्रमाला सर्वच ठिकाणी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशाचप्रकारे चिकटे यांनी मुलीच्या लग्नासाठी साठवलेली रक्कम क्षणाचाही विलंब न करता त्यांना देऊ केली. याकरता कुटुंबीयांनीही विरोध न करता उलटार्थी पाठबळ दिले असल्याचे सुशील चिकटे यांनी सांगितले.
सुशील यांच्या पत्नी आशाबाई या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. या दाम्पत्यांनी महिन्याकाठी ७ हजार ५०० प्रमाणे मागील ५ वर्षांपासून मुलीच्या नावे पोस्टामध्ये रक्कम भरली होती. दरम्यान, या रकमेचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने सुशील यांनी ही संकल्पना पत्नी आशाबाई यांना बोलून दाखविली. त्याप्रमाणे ७ एप्रिलला जाहीर सभेत ही रक्कम प्रकाश आंबेडकर यांना देऊ केली. सुशील हे कोणा पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते नाहीत. केवळ चांगल्या उपक्रमाला हातभार म्हणून त्यांनी ही मदत केल्याचे सांगितले.
यावेळी मुलीच्या लग्नासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे आशाबाई चिकटे यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीकडे आजकाल बघण्याचा दृष्टीकोन बदलास भाग पाडेल, असा उपक्रम चिकटे दाम्पत्यांनी हाती घेतला असल्याचे दिसून येते.