लातूर - सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर तालुक्यातील काटगावात घडली आहे. हुंड्यातील एक लाख रुपये आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरहून घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. त्यामुळेच महिलेने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा... बीएसएफच्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू; मागील २४ तासांत ४१ जवान बाधित
रेणापूर येथील शुभांगी भालेराव यांचा विवाह काटगाव येथील अतुल बोळे यांच्याशी झाला होता. विवाह होताच काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यातील राहिलेले 1 लाख व ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून 1 लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावल्याचे मृत शुभांगीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळूनच शुभांगी हिने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर येताच सासरच्या मंडळीने घरातून पळ काढला होता. मात्र, माहेरहून शुभांगी यांचा भाऊ, वडील हे काटगावात दाखल झाले होते.
गुरुवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, सासरच्या मंडळींना ताब्यात घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार केले जाणार नाही. असा पवित्रा रेनापूरच्या नागरिकांनी घेतला होता. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी आश्वासन देताच महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मुकुंद भालेराव यांच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुभांगीचा नवरा अतुल बोळेसह सासू, सासरे, दिर, भावजई, जाऊ अशा 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.