लातूर - इयत्ता बारावीचा निकाल लागल्यापासून गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत तब्बल १२५७ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी मंडळाकडे अर्ज दाखल केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पडताळणीची संख्या वाढत असून विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी कमी गुणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग होत आहे. प्रश्नपत्रिकेचे बदलले स्वरूप विद्यार्थ्यांच्या लक्षात न आल्याचा हा परिणाम असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.
लातूर पॅर्टनचा यंदा निकालात टक्का घसरला असून राज्यातील ९ विभागीय मंडळात लातूरचा सहावा क्रमांक लागला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थीही या निकालावर असमाधानी असल्याचे दिसत आहेत. शुक्रवारपर्यंत लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातून १२५७ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. गतवर्षी हीच संख्या ही ९०० एवढी होती. यंदाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतील प्रश्नपत्रिकेचा आराखडा बदलण्यात आला होता.
नीट, जेएईच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंडळाच्यावतीने ऑक्टोबर महिन्यात विभागातील तिन्हीही जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे स्वरुप पोहचलेच नसल्याचे बोर्डाचे म्हणने आहे. तर पालकांमधून मात्र, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांना लक्ष केले जात आहे. प्राध्यापकांनीच व्यवस्थित उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गुणपडताळणीची नामुष्की ओढावत असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
गुणपडताळणीसाठी यंदा विद्यार्थ्यांनी सर्वात अधिक अर्ज केले आहेत. १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून अर्ज केल्यानंतर पाच दिवसाच्या आतमध्ये तक्रारीसह बोर्डाकडे अर्ज करता येणार आहे. या पडताळणीनंतरच नेमके विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका सोडविताना गणित चुकले की प्राध्यापकांचे उत्तरपत्रिका सोडिवताना हे तर येणाऱ्या वेळतच समोर येणार आहे.