लातूर - लॉकडाऊनच्या काळात गंजगोलाई येथे फळविक्रीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्याची मागणी फेरीवाल्यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय.
गंजगोलाई ही लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी उद्योग-व्यवसायिकांसोबतच फळविक्रेते आणि भाजीपाला विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली होती. तसेच या जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र परिस्थिती पूर्ववत होत आहे. त्यामुळे या ठिकाणचे पार्किंग हटवून पुन्हा फेरीवाल्यांना बसण्याची मागणी फळविक्रेत्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच त्वरित प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यापूर्वी फेरीवाल्यांनी पोलिसांची थेट गांधी चौक पोलीस ठाण्यात भेट घेतली होती. मात्र, ही कारवाई मनपाने केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या विरोधात आज फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.
मनपाकडून आश्वासनाची पूर्तता नाही
लॉकडाऊननंतर गंजगोलाईतील फेरीवाल्यांना फळविक्रीची देण्याच्या परवानगीसंबंधी बैठक घेण्यात आली होती. यासाठी 200 फेरीवाल्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त एम. डी. सिंह यांची भेट घेतली होती. त्यांनी परवानगी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांमध्ये त्यांची बदली झाली. त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. मनपा अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत. प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप फेरीवाले करत आहेत.
उपासमारीची वेळ
लॉकडाऊनच्या काळात गंजगोलाई भागातील फळविक्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. त्यामुळे या भागात असलेल्या 200 फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली. आता अनलॉकमध्ये सर्वकाही सुरू होऊन देखील फेरीवाल्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल घेऊन विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.