लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व धार्मिकस्थळे कुलूपबंद आहेत. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवरीही हे चित्र सर्वत्र पाहवयास मिळाले. मात्र, नेत्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी अनेक मंदिरात दुग्धाभिषेक, पूजा, होम-हवन केले जात आहे. त्यामुळे भक्तांच्या श्रद्धेपुढे राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांची श्रद्धा किती महत्वाची आहे हे समोर येत आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचार मुंबईतील खासगी रुग्णालयात सुरू आहेत. पण, त्यांच्या मतदार संघातील अनेक मंदिरात शेकडो कार्यकर्ते प्रार्थना करीत आहेत.
सर्वसामान्य नागरिकाला कोरोनाची लागण झाली तर त्याचे नावही समोर येणार नाही, याची दक्षता घेतली जाते. पण, राजकीय नेते मात्र स्वतःहून समोर येऊन लागण झाल्याचे सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी जिल्ह्यातील औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील-निलंगेकर आणि आता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाही लागण झाली आहे. जिल्ह्यातील गल्ली बोळातील मंदिरे बंद आहेत. पहिल्या श्रावण सोमवारी गजबजणाऱ्या मंदिरात कोरोनामुळे कमालीचा शुकशुकाट होता. मात्र, काही मंदिरे ही कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली होती. ना कोणत्या नियमांचे पालन ना कारवाईची धास्ती. यापूर्वीही नेत्यांच्या आरोग्यासाठी, असे प्रकार झालेले आहेत. आता तर सत्ताधारी नेत्यांसाठी सर्व नियमांचा फज्जा उडवला जात आहे. एवढेच नाही तर नेत्याची किती काळजी आहे हे दाखविण्यासाठी याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहे. हा सर्व प्रकार प्रशासनासमोर असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष. उदगीर मतदार संघातील घावन, जळकोट येथील बालाजी मंदिर, वांजरवाडा येथील गोविंद माऊली मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन कारवाई करेल का जे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.