लातूर - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेली लालपरी आज धावायला लागली आहे. जिल्हाअंतर्गत ही बससेवा सुरू झाली असून लातूरातून 'लातूर- उदगीर' ही पहिली बस आज(शुक्रवार) सकाळी 8 वाजता धावली आहे. त्यामुळे प्रवाशांची तर सोय झालीच आहे शिवाय कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, नियम आणि अटींमध्ये ही बससेवा सुरू असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनाच स्वतःचे रक्षण करावे लागणार आहे.
लातूर विभागात 350 बसेस असून या सर्व बसेसची चाके गेल्या दोन महिन्यांपासून बंद होती. अखेर नियमात शिथिलता आणत आजपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. आज पहिल्याच दिवशी लातूर विभागातील पाचही डेपोतून बसेस मार्गस्थ झाल्या आहेत. विशेष म्हणजे, वयोवृद्ध नागरिकांना तसेच लहान मुलांना प्रवास करता येणार नाही. शिवाय बसमध्ये केवळ 21 जणांनाच प्रवास करता येणार आहे.
लातूर विभागातील 350 बसेसचा 1 लाख 80 हजार किमीचा प्रवास होतो. तर, यामधून दिवसाकाठी 50 लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, दोन महिने ही सेवा बंद राहिल्याने विभागाचे तब्बल 35 कोटींचे नुकसान झाले आहे. हेच नुकसान भरून निघावे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यादृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर आज तालुक्याच्या ठिकाणी बसेस मार्गस्थ होणार आहेत. तर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही सेवा वाढविण्यात येणार आहे. शारीरिक अंतर या नियमांची पालन करून हे सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर बसस्थानकावर गर्दी कमी असली तरी दिवसेंदिवस यामध्ये वाढ होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.