लातूर: लातूरच्या सृष्टी सुधीर जगताप या महाविद्यालयीन तरुणीने जागतिक विक्रम मोडीत काढण्यासाठी २९ मे, २०२३ रोजी सकाळी लातूर शहरातील दयानंद सांस्कृतिक सभागृहात सुरुवात केली. ०३ जून, २०२३ रोजी तब्बल १२७ तास वैयक्तिक नृत्य सादर करीत नेपाळच्या बंदना नेपाळीचा १२६ तासांचा विश्वविक्रम मोडीत काढला. याप्रसंगी 'गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'च्या भारतीय अधिकाऱ्यांनी सृष्टीला नवा विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र बहाल केले. याप्रसंगी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश लोखंडे यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी व लातूरकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नेपाळच्या वंदनाचा विश्वविक्रम मोडला: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रशासकीय अधिकारी स्वप्निल डांगरीकर म्हणाले की, सन २०१८ मध्ये नेपाळच्या वंदना नेपाळ नामक तरुणीने सलग १२६ तास वैयक्तिक नृत्य करत हा विश्वविक्रम तिच्या नावे केला होता. त्यानंतर मागील पाच वर्षात हा विश्वविक्रम कोणीही मोडीत काढला नव्हता. परंतु आज ०३ जून,२०२३ रोजी लातूरच्या सृष्टी सुधीर जगताप या महाविद्यालयीन तरुणीने हा विश्वविक्रम भारताच्या नावे करत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला अनोखी भेट दिली आहे. शिवाय नृत्याचा नवा विश्वविक्रम करणारी लातूरची सृष्टी जगताप ही नेपाळच्या वंदनापेक्षा वयाने अधिक तरुण आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
भारताच्या हेमलताचा विक्रम मोडला होता: नेपाळमधील एका मुलीने जगात सर्वाधिक तास डान्स करण्याचा विक्रम केला होता. या मुलीने 126 तास सतत डान्स करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले होते. वंदना नेपाळ नावाच्या या मुलीने गेल्या वर्षी नेपाळच्या राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानी आयोजित मेळाव्यात डान्स केला होता. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात वंदना हिचा हा पराक्रम गाजवल्याबद्दल सत्कार करण्यात आला होता. वंदनाने भारताच्या हेमलताचा विक्रम मोडला होता.
हेही वाचा -