लातूर- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मजूर तसेच जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी सोमवारी कोल्हापूर आणि पुणे येथे बस सोडण्यात आली. मात्र, इतर ठिकाणी जाण्यासाठीची बस ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून आदेश आल्यावरच पुढील बससेवा सुरू होणार आहे.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
परजिल्ह्यात किंवा परराज्यात मार्गस्थ होण्यासाठी सोमवारी लातूर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, एका बसमध्ये 20 प्रवाशीच अशी मर्यादा घालून देण्यात आली होती. त्यामुळे दीड महिन्यानंतर लातूर-पुणे अशी बस धावली. मात्र, कोल्हापूरकडे मार्गस्थ होण्यासाठी प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागली. अनेक प्रवाशांनी कागदपत्रांची पूर्तता करुन जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतली. परंतु, स्थानकावर येताच केवळ पुणे आणि कोल्हापूरसाठीच बससेवा असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे इतर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, ऐनवेळी बससेवा बंद ठेवण्याचे आदेश बस डेपोला आले. त्यामुळे सातत्याने नियमात होणाऱ्या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस दाखल होताच परवाना काढलेल्या प्रवाशांना संपर्क करुन बोलावले जात आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन नाही. शिवाय प्रवाशांची संख्या शेकडोत असली तरी केवळ 20 प्रवाशांनाच प्रवास करता येत असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.