लातूर - सकाळच्या प्रहरी विद्यार्थ्यांची रेलचेल सुरू झाली आहे. कुणी सायकलवरून तर कोणी पायी शाळेकडे मार्गस्थ होत असलेले चित्र आठ महिन्यानंतर पाहवयास मिळत आहे. ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात होते. मात्र, शाळेची ओढ ही काही न्यारीच असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून होता. आज तब्बल आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. लातूर जिल्ह्यातील 647 पैकी 542 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.
शासनाच्या नियमानुसार भरणार वर्ग -
शैक्षणिकदृष्ट्या लातूर जिल्ह्याला वेगळे महत्व आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने कमालीचा शुकशुकाट होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आणि सोमवारपासून 22 जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेताच त्यांची प्राथमिक तपासणी केली जात होती. त्याचबरोबर पालकांचे समंतीपत्र हे बंधनकारक करण्यात आले होते. विशिष्ट अंतर राखून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. नियम अटींचे पालन करून आज लातूर शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी इयत्ता 9 वीचे वर्ग भरले आहेत तर उद्यापासून इयत्ता 10 वीचे वर्गही भरले जाणार आहेत. पहिल्या दिवशी शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर आठ महिन्यानंतर प्रार्थना, राष्ट्रगीत विद्यार्थ्यांची रेलचेल यामुळे नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र, हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शाळांना नियमांचे पालन करावेच लागणार आहे.
ऑनलाइन पेक्षा ऑफलाइन शिक्षणालाच विद्यार्थ्यांची पसंती -
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढवली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेही पण शाळेत येऊन धडे गिरविण्याची मजाच काही और असते अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे शाळा कायम सुरू राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा -राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली; जाणून घ्या कुठे उघडल्या शाळा, तर कुठे आहेत बंद