लातूर - दरवर्षी बेभरवशाचा असलेला खरीप हंगाम यंदा मात्र, शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी टाकेल, अशी आशा आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून सर्व काही आलबेल असून खरिपातील सर्वच पिके बहरात आहेत. यातच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वाचा असतो. दरवर्षी अनिश्चित आणि अनियमित पावासामुळे उत्पादनावर परिणाम हा होतो. गतवर्षी खरिपातील पिके अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होतीच शिवाय सोयाबीन डागाळले होते. परिणाम शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळाला नव्हता. यंदा मात्र, पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मशागत आणि वेळीच पेराही झाला होता. सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मध्यंतरी पावसाने ओढ दिली होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. अशाप्रकारचा मूर पाऊस सर्वच पिकांसाठी पोषक ठरत आहे. असे असले तरी ढगाळ वातावरणामुळे किडीचा धोका निर्माण होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना वेळीच याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातुरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी ऐन गरजेवेळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिके तर बहारत आहेत. मात्र, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले तर दर काय मिळतो हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागील दोन महिन्याच्या कालावधीत निसर्गाने तर साथ दिली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर यंदा विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शेतकऱ्यांनी किडीचा धोका ओळखून योग्य ती फवारणी करून घेण्याचे आवाहन कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.