लातूर- गेल्या सहा दिवसांपासून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते उपोषणाला बसले आहे. या उपोषणाला संबंध मराठवाड्यातून प्रतिसाद मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मागण्या मान्य केल्या तर ठीक, अन्यथा २३ ऑगस्टला मराठवाडा बंदची हाक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, दुष्काळ हाच निकष लावून खरिपातील प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई करणे, पिकविमा रक्कम अदा करणे, सरसकट वीजबिल माफ करणे, या मागण्यांसाठी विजय पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. १६ ऑगस्टपासून त्यांनी या उपोषणाला सुरूवात केली आहे. याकरिता केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील विविध संघटनांनी देखील पाठींबा दिला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने किंवा लोक प्रतिनिधींनी या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे आता गांधी मार्गाने नव्हे तर भगत सिंगच्या पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ छावा संघटनेवर आली आहे. दोन दिवसांमध्ये प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य न केल्यास सबंध मराठवाडा बंद करण्याची हाक, छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे.
शिवाय गुरुवारी औसा शहर बंद ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे. जनावरांच्या दावणीला चारा आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी हे आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत, तर मराठवाड्यातील बळीराजा भर पावसाळ्यात दुष्काळाने होरपळत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आंदोलनकर्ते विजयकुमार घाडगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे.