लातूर - सांगली जिल्ह्याने 2015-16 च्या भीषण दुष्काळात लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा केला होता. आता याच जिल्ह्यातील नागरिकांवर महापुराने अस्मानी संकट ओढावले आहे. त्यामुळे लातूरकर एकवटले असून दररोज 5 हजार नागरिकांना पुरेल एवढे अन्न आणि उपयोगी साहित्य पूरग्रस्त भागाकडे पाठवले जात आहे. लातुर आणि उदगीर येथून मदतीचा ओघ कायम आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महापूर तर मराठवाड्यात भीषण दुष्काळ असे सध्याचे चित्र आहे. मात्र, महापुराने सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक ठीकाणांहून पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या पावसाअभावी दुष्काळाची स्थिती आहे . मात्र या स्थितीची चिंता न करता शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येवून उदगीर इथे पूरग्रस्तांसाठी दररोज जेवण पाठवण्याची तयारी केली आहे .
मिरज-सांगलीकरांनी दुष्काळात लातूरला रेल्वेने पाणी पाठवले होते. याची जाणीव इथल्या लोकांमध्ये कायम आहे. दररोज किमान पाच हजार लोक जेवण करू शकतील यासाठी पराठे, पुरी-भाजी, लोणचे, पाणी बॉटल आणि ब्लँकेट पूरग्रस्त भागात पाठविण्यात येत आहे. स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या भागातील नागरीक स्वतःहून सहभाग घेत आहेत. श्रावण महिन्यानिमित्त उदगीरमध्ये डॉ .शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे तपोनुष्ठान सुरु आहे. यासाठी उभारण्यात आलेला मंडप जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे.