लातूर - कोरोनाच्या महामारीत डॉक्टर्स पहिल्या फळीत काम करत आहेत. मात्र, याच डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लातूरमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटना असल्या तरी वारंवार का घडत आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या दोन्ही घटनानंतर काही घटक हे डॉक्टरांच्या समर्थनार्थ आहे, तर काही हल्लेखोरांचे समर्थन करीत आहेत. सोई-सुविधा किंवा नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने अशा घटना सर्रास शासकीय रुग्णालयात घडतात. परंतु, लातुरात या दोन्ही घटना खासगी रुग्णालयाच्या संदर्भात घडल्या आहेत. त्याची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.
कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे शहरातील जवळपास १५ खासगी रुग्णालये ही कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयात उपचाराला सुरुवात होताच अल्फा सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल चर्चेत आले. याठिकाणी उदगीर येथील ६० वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते. धाप लागत असल्याने या महिलेला या खासगी रुग्णलयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही निष्पन्न झाले होते. मात्र, याची माहिती नानेवाईकांनी वेळीच देण्यात आली नाही. शिवाय दिवसाकाठी हजारो रूपये खर्चून उपचार सुरू असताना नातेवाईकांनी प्रकृती विषयी विचारणा केली यात गैर काय? मात्र, खासगी रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांकडून होणाऱ्या अरेरावीला नातेवाईक त्रासले होते. शिवाय उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यूही झाला. दिवसाकाठी हजारो रुपये खर्चूनही रुग्ण दगावल्याने त्या महिलेच्या मुलानेच डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर हल्ला केला होता. ओढावलेल्या परस्थितीमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून घडलेला प्रकार साहजिक आहे. मात्र, अशा घटना व्हायला नको.
दरम्यान, बुधवारी घडलेल्या दुसऱ्या घटनेत एका डॉक्टरानेच डॉक्टरला अक्षरश: दगडाने मारहाण केली. हा प्रकरणामागेही पैशाचेच कारण होते. लक्ष्मण मोहाळे हे येथील गायत्री सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये आर. एम. ओ. म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी हे हॉस्पिटल देखील कोविड सेंटर म्हणून घोषित केले गेले. दोन महिने काम केल्यानंतर लक्ष्मण मोहाळे यांनी काम सोडले. परंतू, कामाचा मोबदला घेण्यासाठी ते डॉ. रमेश भराटे यांच्याकडे आले होते. दरम्यान डॉ. रमेश भराटे आणि लक्ष्मण मोहाळे यांच्यात बाचाबाची झाली आणि मोहाळे व त्यांच्या मुलाने डॉक्टरांना थेट दगडाने मारहाण केली. यामध्ये डॉक्टरांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या दोन्ही घटनांचे पैलू जरी वेगळे असले तरी कारण मात्र पैसा हेच आहे. या दोन्ही प्रकारावरून सोशल मीडियावर विविध अंगानी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचे समर्थन कधीच होऊ शकत नाही.