लातूर - जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. निसर्गाच्या लहरीपणाप्रमाणेच प्रशासनाची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन लातूर-बार्शी या राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्तारोको आंजदोलन करण्यात आले.
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जनावरांचा बाजार भरवणार
१५ दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत. ते न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जनावरांचा स्वाभिमानी आठवडी बाजार भरवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
चारा छावणीला नको तर दावणीला द्यावा
जिल्ह्यात दुष्काळाची परंपरा कायम असल्याने यंदाही खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. पावसाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले असून याकरिता हेक्टरी ५० हजाराची मदत करण्यात यावी. जनावरांसाठी छावण्या नको तर दावणीला चारा द्यावा. पीक विमा रक्कम त्वरित अदा करण्यात यावी.

पीक विम्यासाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात
सध्या पेरणी केलेले क्षेत्रही धोक्यात असून पीक विम्यासाठी जाचक अटी सकरकारने लादल्या आहेत. त्या शिथिल करून सरसकट मदत करण्याची मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते सत्तार पटेल यांनी केली.
सकाळी ११ वाजता रास्तारोको करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी बैलगाडी घेऊन उपस्थित झाले होते. लातूर-बार्शी या मुख्य मार्गावरच तब्बल दोन तास रास्तारोको केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, स्वाभिमानी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष महारुद्र चौंडे, तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, प्रवक्ता सत्तार पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थिती होते. अखेर मंडल अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.
