लातूर - जिल्ह्याच्या निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या रक्ताच्या नात्याला बगल देत कोविड सेंटरमध्ये रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या महिलांना बहिणीचा मान देत त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. त्यांना भाऊ या नात्याने साडीचोळी देऊन सन्मान केला.
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. मात्र, यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. निलंगा शहरातील जाऊ रोड व दापका रोड येथील दोन कोविड सेंटरमधील १४ महिला गेल्या ५ महिन्यांपासून दिवसरात्र एक करत कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. अशा या कर्तव्यनिष्ठ कोविड योद्धा महिलांकडून तहसीलदाराने राखी बांधून घेऊन बहिणी मानून त्यांची साडी चोळी देऊन सन्मान केला. अशा संकट काळात तर मी माझ्या बहिणीकडे जाऊ शकत नाही, म्हणून कोरोना रुग्णसेवा करणाऱ्या या १४ महिलांना माझ्या बहिणी मानून मी त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. यापेक्षा माझे मोठे भाग्य काय असे तहसीलदार गणेश जाधव यावेळी म्हणाले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमानिमित्त डॉ. सौदळे, पत्रकार श्रीशैल्य बिराजदार, अभिमन्यू पाखरसांगवे, परमेश्वर शिंदे, तुकाराम सूर्यवंशी, असलम झारेकर, साजीद पटेल, रविकिरण सूर्यवंशी मसलगेकर आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.