लातूर - वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणीच इतर सेवा उपलब्ध करून द्या, अशा सूचना पालकंमंत्री अमित देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास हातभार लागणार आहे.
जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यांनातर देशमुख यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील भाजी- मंडई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी गल्ल्यांध्ये भाजीपाला विक्री सुरू आहे. यामुळे आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. यावर पर्याय म्हणून प्रभागनिहाय रेशन दुकानजवळच भाजीपाला आणि फळविक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या.
कोरोनाचा प्रदुर्भाव कमी करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात महापालिकेचे पदाधिकारी व अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शासकीय उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यात आलाय. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा विरोधी पक्षनेते दिपक सुळ, अतिरीक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, महापालीकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शहरात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, खबरदारीसाठी आणखी उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.
शहराच्या हद्दींवर नाकेबंदी करण्यात यावी, मनपा व पोलीस अधिकाऱ्यांनी सक्तीची तपासणी करूनच लोकांना शहरात प्रवेश द्यावा, असे पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.