लातूर - निलंग्यातील बसवेश्वर नगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका गर्भवती महिलेस पूर्ववैमनस्यातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. तर, अन्य एका महिलेचं डोकं फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मारहाण करणाऱ्या चौघांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
बसवेश्वर चौकात वास्तव्यास असणाऱ्या वैष्णवी वैजनाथ म्हेत्रे या आपली नणंद लता शेषराव दापके यांच्यासह घरात बसल्या होत्या. रात्री 10 च्या सुमारास भाग्यश्री नागनाथ म्हेत्रेने भाऊ नागनाथ त्र्यंबक पालकर आणि इतर अज्ञात दोन व्यक्तींसोबत घरात प्रवेश करून त्यांना पट्टायाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भाग्यश्री म्हेत्रे हिने घरावर हक्क सांगत वैष्णवी राहत असलेलं घर स्वत:चं असल्याचा दावा केला.
मारहाण झालेल्या वैष्णवी म्हेत्रे आठ महिन्यांच्या गर्भवती असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच कपाट खिडकीच्या काचा फोडून जवळपास 20 हजारांचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. अनेकवेळा माझ्या पतीला भाग्यश्रीने भावासह जाऊन मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित चार जणांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत निलंगा पोलीस ठाण्यात (30 सप्टेंबर) गेल्यानंतर तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. तसेच चार दिवसांनी पोलिसांनी तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. मारहाणी दरम्यान शेजारी राहणाऱ्यांनी मध्यस्ती केल्याने हे भांडण तात्पुरते थांबल्याचे तक्रारदार म्हणाल्या.
चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक केली नसल्याचा आरोप वैष्णवी म्हेत्रे यांनी केला आहे.