लातूर - झोपटपट्टीमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने तीन ठिकाणी या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून महापालिकेने घरे बांधली. 12 वर्षांपूर्वी शहरातील जय नगर परिसरात उभारलेल्या चार इमारतींमध्ये 300 कुटुंब वास्तव्यात आहेत. मात्र, येथील स्वच्छता व गटाराकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील मुख्य भागात असलेल्या झोपटपट्टीधारकांना आर्वी, जय नगर याठिकाणी जागा उपलब्ध करून घरे बांधून देण्यात आली होती. असे असले तरी, राजकीय स्वार्थ साधून ज्यांच्याशी सलगी आहे, अशाच नागरिकांना घरे मिळाल्याचा आरोप झोपटपट्टीत राहणारे नागरिक करत आहेत. तर दुसरीकडे, ज्यांना घरांचा लाभ मिळालेला आहे, त्यांच्या अडचणी कायम आहेत. काळाच्या ओघात या इमारतींची पडझड सुरू आहे. शिवाय, पावसाळ्यात गळतीही लागली आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर कामे होतात, पण ती कायमस्वरूपी होत नाहीत.
मागील 12 वर्षांत या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारीही फिरकलेले नाहीत. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर आणि पावसाचे पाणी संसारवर, अशी अवस्था झाली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत 20 हजार 986 घरांना मंजुरी आहे. मात्र, प्रत्यक्षात 2 हजार 75 घरे पूर्ण झाली असून 746 घरांचे काम सुरू आहे. तर 614 जणांचे प्रस्ताव हे प्रक्रियेत आहेत. योजनेच्या पूर्णत्वाला वेळ असला तरी किमान ज्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यांना मूलभूत सुविधा तरी मिळणे गरजेचे आहे.
हेही वाचा - ७४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; सरसकट पंचनामे करण्याचे संजय बनसोडे यांचे निर्देश