देवणी- (लातूर) - जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील टाकळी येथे सोमवारी सकाळी बालविवाह होणार असल्याची माहिती वलांडी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांनी तात्काळ टाकळी गाठून हा बालविवाह रोखला.
मौजे टाकळी येथील वर व कर्नाटकातील तुगाव येथील वधू यांचा विवाह सोहळा नियोजित झाला होता. लॉकडाऊनमुळे चार भिंतीच्या आत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह होत आहेत. हीच संधी साधत टाकळीत अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, आज सकाळीच मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस विवाह होत असलेल्या घरी पोहोचले. त्याठिकाणी वधू आणि वर पक्षाकडील मंडळींना बालविवाह हा कायद्यान्वये गुन्हा आहे, असे समजावून सांगितले. कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला.
पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांनी मध्यस्थी करुन बालविवाह रोखला. तसेच विवाह केल्यास बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीदही दोन्ही कुटुंबीयांना देण्यात आली.