लातुर - जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने थकीत मानधन आणि भत्ता बिल काढून देण्यासाठी १० हजाराची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने विलास मानखेडकर यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, यामध्ये वरीष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तक्रारदाराने सन २०१६ ते २०१८ च्या कालावधीमधील केलेल्या कामाचे महिना ३ हजार प्रमाणे तसेच ५०० रुपये प्रमाणे ५२ महिन्यांच्या भत्त्याची मागणी केली होती. याकरिता एकात्मिक पाणलोट क्षेत्राततील विलास मानखेडकर यांनी १० हजाराची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा कृषी अधिकक्षक कार्यालयासमोरील चहाच्या टपरीवर ही लाच स्वीकारली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.
याप्रकरणी पडताळणी केली असता घटनास्थळहून विलास मानखेडकर याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे, कुमार दराडे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे यांनी ही कारवाई केली. शिवाजीनगर ठाण्यात विलास मानखेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई झाली असली तरी खरा सूत्रधार हा पडद्यामागे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाणी नेमके कुठे मुरत आहे? हे तापसाअंती समोर येणार आहे.