लातूर : पोलीस ठाण्यात लाच स्विकारताना एका पोलीस नाईकला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तक्रारी अर्जात कारवाईत मदत करण्यासाठी पोलीस नाईक मुरलीधर दंतराव यांनी 15 हजारांची लाच मागितली होती. लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वालांडी पोलीस चौकीत ही कारवाई केली.
श्रीमंत बिराजदार यांच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारी अर्जात नमूद केल्यानुसार कार्यवाही करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत त्याबदल्यात 15 हजार रुपयांची लाच दंतराव यांनी मागितली होती. त्यानुसार तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दंतराव यांच्याकडून सातत्याने पैशाची मागणी होत असल्याने तक्रारकर्त्याने लातूर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास वालांडी पोलीस ठाण्यातच 10 हजार रुपये घेताना दंतराव यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाय मुरलीधर दंतराव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.