लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येताच लग्न धुमधडाक्यात होऊ लागले आहेत. उदगीर तालुक्यातील वाढवना बुद्रुक येथे रविवारी दुपारी लग्नसमारंभ पार पडला. काही वेळातच वऱ्हाडी मंडळीला उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला. लग्न समारंभ पार पडल्यानंतर 100 जणांना थेट रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. या समारंभात जवळपास 2 हजारहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, जेवणावळी उठताच वऱ्हाडी मंडळीला उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला. वाढवना प्राथमिक आरोग्य केंद्रात बधितांवर उपचार सुरू आहेत.
अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज
उदगीर तालुक्यातील वाढवना येथे इसाक इनामदार यांच्या मुलीचा रविवारी दुपारी विवाह पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच कोणत्याही नियमांचे पालन या सोहळ्यात पाळण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. लग्न समारंभ उरकताच वऱ्हाडी मंडळींच्या जेवणावळी झाल्या. यानंतर मात्र अनेकांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला. यात 30 लहान मुलांचाही समावेश होता. बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांना वाढवना, हाळी आणि उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जेवणातील चकली या पदार्थामुळे ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने यात कुणाचीही प्रकृती गंभीर नाही. तरुणांना उपचारानंतर सोडण्यात आले मात्र, लहान मुलांवर उपचार सुरूच होते. चकली या पदार्थातून ही विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यमंत्र्यांचीही उपस्थिती, जिल्हा परिषद अध्यक्षांकडून रुग्णांची पाहणी
वाढवना येथे पार पडलेल्या विवाह समारंभात राज्यमंत्री संजय बनसोडे यांचीही उपस्थिती होते. वधू-वराला आशीर्वाद देऊन ते परतले आणि जेवणादरम्यान ही विषबाधा झाली. यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी रुग्णांची भेट घेऊन येथील आरोग्य अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या.
हेही वाचा- 'कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींचा हेखेखोरपणा आडवा आला'