लातूर - राज्यात सत्तास्थापनेवरून रणकंदन सुरू आहे. तासागणीक राजकीय समीकरणे बदलत असून सर्वच राजकीय पक्ष सांभाळून त्यांची भूमिका मांडत आहेत. असे असले तरी सामान्य जनतेचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी त्वरित सत्तास्थापन करण्याची मागणी आता जनता करू लागली आहे. निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवसाचा कालावधी गेला तरी केवळ स्वार्थापोटी राजकीय नेते हे आपली भूमिका बदलत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - अरे बापरे..! महिलेच्या पोटातून निघाला चक्क बारा किलोचा गोळा
निकाल लागून 20 व्या दिवशीही सत्तास्थापनेचे घोडे अडलेलेच असून यासंदर्भात लातुरातील नागरिकांना काय वाटते हे 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जनतेने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
हेही वाचा - लातुरात जिल्हा प्रशासनाकडून डेड-लाईनचे पालन ; पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल, अशी आशा होती. मात्र, ना महायुतीने ते सिद्ध केले आहे ना आघाडीने. राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत बैठकांचे सत्र अविरतपणे सुरू असले तरी प्रत्यक्षात निर्णय होत नाही. मुख्यमंत्री पदावरून जो तो रस्सीखेच करत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी कोणत्याही राजकीय पक्षाला सहानुभूती राहिली नाही. किमान मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरी सत्तास्थापन करण्याची मागणी आता जनता करू लागली आहे. मित्रपक्षांमध्येच एकी नसून ते काय जनतेचे हित साधणार? असाही सवाल नागरिकांनी केला आहे.