लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी येथे माकनी धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या धरणाचेही पाणी संपल्याने मागील ४ महिन्यांपासून ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल होत असल्याने आज (सोमवारी) उपाययोजनांबाबत ग्रामस्थानी लातूर-उमरगा मार्गावर रस्तारोको केला होता.
गावाला पावसाळ्यात तरी माकणी धरणावरून पाणीपुरवठा होईल, असा आशावाद होता. परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांनी पाण्यासाठी भटकंती कायम आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली असली लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या तुटपुंजी आहे. यासंबंधी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज रस्ता रोको आंदोलन केला.
किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत असे, मात्र मागील ४ महिन्यांतून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लातूर उमरगा रस्त्यावर जवळपास दीड तास रस्ता रोको केला. यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष बाब म्हणजे यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी आपल्या हातामध्ये रिकामे हंडे, घागरी घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला होता. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमच पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.