कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2020-21 सालात 147 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पाच लाख पर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज वाटप करणार असल्याची घोषणा करत देशात अशा पद्धतीने कोणत्याही बँकेने उपक्रम राबवला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांचा समूह विमा उतरवण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याला लाभ मिळावा या योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी दिली. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
2020 ते 21 या आर्थिक वर्षात 7128 कोटी रुपयांच्या एकूण ठेवी-
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2020 ते 21 या आर्थिक वर्षात 7128 कोटी रुपयांच्या एकूण ठेवी जमा झाल्या असून गतवर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये भरघोस वाढ झाली आहे. जिल्हा बँकेच्या सर्व 191 शाखा या नफ्यात असून खेळत्या भांडवलामध्ये वार्षिक 1 लाख 52 हजार 240 लाखांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत निव्वळ NPA फक्त 2.20 टक्के असून सीआरएआय प्रमाण सुद्धा 12.25 टक्के आहे असे मुश्रीफ यांनी यावेळी म्हंटले. दरम्यान भविष्यात 10 हजार कोटींच्या ठेवी आणि 200 कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही मुश्रीफांनी सांगितले.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असे जिल्हा बँकेने केले काम - मुश्रीफ
यावेळी मुश्रीफ म्हणाले, आयकर कपातीसाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये रूरल डेव्हलपमेंट फंड सहा कोटी रुपये वर्ग करण्यात आला असून ग्रामीण भागात वाटप केलेल्या कर्जपुरवठा कोटी तीस कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. दरम्यान, पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची देशात एक नंबरला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले असून 208 टक्के कर्ज वाटप करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल, असे काम जिल्हा बँकेने केला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा- वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण, संजय राऊत यांना करावी लागणार कोरोनाची चाचणी